दत्ता पाटील म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील गटाला रोखण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सर्वच प्रमुख गटांनी मूठ बांधली आहे. गतवर्षी जयभवानी दूध संस्थेत सत्तापालट केला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून गावात कोटीची कामे आणल्यामुळे पाटील गटाचा आत्मविश्वास वाढला आहे, तर गत पाच वर्षांत सत्तेत असल्याने अनेक कामांच्या माध्यमातून महायुतीचे नेते नागरिकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे गावात निवडणुकीत टोकाची रस्सीखेच सुरू असून, येथील मैदान कोण मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजकीय आखाड्यापेक्षा येथे कुस्तीला गावात विशेष महत्त्व आहे . घराघरांत पैलवान निर्माण करणारे गाव म्हणून ओळख आहे. एकमेकांच्या इर्षेवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदाने भरविली जातात. ही चढाओढ यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. गतवेळी तिरंगी लढत झाली होती. यावेळी दुरंगी लढतीच्या हालचाली सुरूच आहे. मंडलिक गटातील एक गट रविंद्र पाटील यांना मिळाला आहे. महायुतीच्या विजयासाठी तुकाराम सावंत, शेखर सावंत, अशोक पाटील, रमेश सावंत, बाबूराव हिरुगडे, बाबूराव चावरेकर, बी. एस. पाटील हे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, तर दुसरीकडे उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, भगवान पाटील, सुभाष भांडवले, पी. डी. कदम, विलास साबळे यांनी व्यूहरचना आखली आहे.
वर्षभरापासून तयारी.... गतवर्षी पुराचे पाणी घरात घुसून अनेक कुटुंबे बेघर झाली होती. त्यांना सत्ताधाऱ्यांनी मदतीचा हात दिला होता, तर सत्ता नसतानाही रवी पाटील यांनी पुण्यातून मदत, तसेच धान्य, कपडे आणून मदतीत पुढाकार घेतला होता. कोरोना काळातही दोन्हीकडून नागरिकांना दिलासा देण्याचे काम झाले. त्यामुळे दोन्ही गटांनी जनसंपर्क चांगला ठेवला आहे. एकदंरीत परिस्थिती पाहता लढत अटीतटीची होणार आहे.
सदस्य संख्या-११
प्रभाग-४
मतदार संख्या-३४९१