इंदुमती गणेश ।कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे घराघरांतील गृहिणींवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. सगळेच कुटुंबीय घरात असल्याने प्रत्येकाची वेगळी फर्माईश, रोज नवनवीन चमचमीत पदार्थांची सरबराई, कुटुंबातील ज्येष्ठांचे, अन्य सदस्यांचे पथ्यपाणी, धुणी, वाढलेली भांडी, फरशी, उन्हाळी कामे, सुट्ट्यांमुळे वाढलेली कामे व पसारा, स्वच्छता अशा सगळ्या पातळ्यांवर लढताना त्यांची दमछाक होत आहे. या सगळ्यांचा महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असून, चिडचिडेपणा वाढला आहे.
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कुटुंबातील सगळे आबालवृद्ध सदस्य घरात बसून आहेत. त्यामुळे गृहिणींचा उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा सगळा वेळ कुटुंबीयांची सरबराई करण्यात जात आहे. एरवी सकाळी चहा-नाष्टा झाला की जेवणाचे डबे घेऊन शाळा, महाविद्यालयातील मुले-मुली व पुरुष मंडळी नोकरी-व्यवसाय अशा कामांत व्यस्त व्हायची. महिलांसुद्धा नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर असायच्या. गृहिणींनाही यामुळे दुपारचा वेळ रिकामा मिळायचा. यावेळी थोडी विश्रांती, घरबसल्या काही कामधंदा करीत त्यांचा वेळ निवांत जायचा. सायंकाळी सगळे घरी आल्यानंतर मग जेवणाची तयारी व्हायची.
आता मात्र चित्रच पालटले आहे. सगळ्या वयोगटातील सदस्य सक्तीच्या सुट्टीने घरातच असल्याने प्रत्येकाची खाद्यपदार्थांची फर्माईश वेगळी, चहापासून स्वयंपाकघरामध्ये गेलेल्या गृहिणींना आख्खा दिवसच तिथे काढावा लागत आहे. रोज सकाळ-संध्याकाळी वेगळे जेवण, मध्येच भूक लागली तर चमचमीत नाष्टा; शिवाय उन्हाळी पदार्थ या सगळ्या कामांचा भार महिलांवर पडत आहे.
मानसिक स्वास्थ्य बिघडले...कोरोनामुळे सगळे जग थांबले असले तरी महिला बिचाऱ्या थांबलेल्या नाहीत किंवा त्यांना या सुट्टीचा आनंदही घेता आलेला नाही. दिवसभर कामालाच जुंपून राहावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. स्वत:साठी अजिबात वेळ देता येत नाही. विश्रांती मिळत नसल्याने त्यांची चिडचिड वाढली असून काहींचे मानसिक आरोग्यही बिघडले आहे.
पुरुषांच्या नैराश्याशी सामनालॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्याने अनेक पुरुषांमध्ये नैराश्य आले आहे. रोजगार नाही, पैसा नाही, नोकरदार असले तरी भविष्यात नोकरी राहीलच याची खात्री नाही, पगार नाही. त्यामुळे पुरुषांमधील हिंसक किंवा चिडचिडी वृत्ती वाढली आहे. त्यांचा राग महिला व लहान मुलांवर निघत असून, त्यांना या प्रसंगांचाही सामना करावा लागत आहे.
कामवाल्या मावशीही बंद झाल्याएरवी कामवाल्या मावशींचा नोकरदार महिलांना मोठा आधार असतो. आता या मावशीनींही येणे बंद केले आहे. त्यामुळे घराची झाडलोट करण्यापासून ते स्वयंपाक, फरशी, धुणीभांडी ही सगळीच कामे महिलांच्या अंगावर येऊन पडली आहेत. त्यात माणसे जास्त असल्याने भांड्यांचा ढीग साचतो. या कामात कुटुंबीयांकडून काही वेळा मदत होते; पण ९० टक्के कामे महिलांनाच करावी लागतात.