कोल्हापूर : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना आता पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागणार आहे. त्यादृष्टीने महसूल, आरोग्य आणि जिल्हा परिषद यंत्रणेला सज्ज रहावे लागणार आहे.
गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात दोन वेळा जिल्हा पुराच्या उंबरठ्यावर होता. परंतु सुदैवाने अगदी टोकाला आल्यानंतर पाऊस कमी झाल्यामुळे दोन वेळा पूर टळला. परंतु यंदाच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उशिरा सुरू झाल्याने पावसाने मोठा दणका दिला असून दोन दिवसातच जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अगदी चार दिवसांपूर्वीपर्यंत कोरोनावरच लक्ष केंद्रित करून आरोग्य विभाग आणि प्रशासन काम करत होते. पूरस्थितीबाबत पूर्वतयारी सुरूच होती. परंतू प्राधान्य काेरोना नियंत्रणाला होते. मात्र गेल्या दोन दिवसांतील प्रचंड पावसामुळे आता अनेक पातळ्यांवर लढाई सुरू झाली आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाला कोरोनाबाबत काम करत असताना आता पूरस्थितीमुळे बाधित नागरिकांचेही आरोग्य जपावे लागणार आहे. महसूल, जिल्हा परिषदेची यंत्रणाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे.
चौकट
प्राथमिक आरोग्य केंद्रे २४ तास उघडी ठेवा
पूरस्थितीच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे २४ तास उघडी ठेवा अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी बाराही तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तालुका पातळीवर २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू करावा, २४ तास प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार होतील याची काळजी संबंधितांनी घेतली आहे. साथरोगासाठी आणि अन्य २१ प्रकारचा पुरेसा औषध पुरवठा शिल्लक आहे याची खात्री करावी, संर्पदशांची औषधे उपलब्ध ठेवावीत, केंद्राचे दूरध्वनी नादुरुस्त असतील तर दुरुस्त करून घ्यावेत. आणि कर्मचाऱ्यांचे मोबाइल कायम सुरू असले पाहिजेत, नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही परिस्थितीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्र सोडायचे नाही. पुरेशा मनुष्यबळाची उपलब्धता करून वरिष्ठ पातळीवरून अचानक निरोप आल्यास सर्व कर्मचारी उपस्थित राहतील, अशी व्यवस्थाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
गरोदर महिलांना चार दिवस आधीच आणण्याच्या सूचना
ज्यांची प्रसूतीची तारीख जवळ आली आहे अशा गरोदर महिलांना तारखेच्या आधीच चार दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करून घ्यावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. पुरामुळे जर स्थलांतर करण्यात आले तर शिबिरातील महिला आणि मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचीही सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
पुराबरोबरच कोरोनाची भीती
आता ज्या गावांमध्ये, वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे अशांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. अशा स्थलांतरितांच्या शिबिरामध्ये सर्वांची अँटिजेन चाचणी करण्याच्या सूचना असून एकीकडे पुराची भीती आणि पुन्हा कोरोनाचा तणाव अशा कचाट्यात अनेकजण सापडले आहेत.