राजीव मुळ्ये - सातारा -‘मिरवणुकीतील गर्दी आणि गोंगाटाने हत्ती बिथरू शकतो आणि माणसांना धोका पोहोचू शकतो,’ हे वनखात्याने महिन्याभरापूर्वीच लेखी स्वरूपात कळविले होते. या अनुषंगाने दिलेल्या आदेशात सक्षम कारण असल्याखेरीज हत्तींना मिरवणुकीत सहभागी करू नये, असे म्हटले होते. या आदेशाची प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. तथापि, हा आदेश शहरी भागासाठी काढला असल्याने यात्रा-जत्रांची ग्रामीण ठिकाणे यातून सुटण्याची शक्यता आहे. पाळीव हत्तींना शहरी भागातील गर्दीच्या ठिकाणी मज्जाव करणारे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीवरक्षक (महाराष्ट्र) यांनी दि. ९ डिसेंबर २०१४ रोजी दिले आहेत. शहरी भागात मिरवणुकांमध्ये हत्तींना सहभागी करून घेण्यात येते. मनोरंजनासाठीही त्याचा वापर केला जातो. तेथील गर्दी आणि वाहतुकीचे आवाज यामुळे हत्ती बिथरू शकतो, त्यामुळे ही बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशातील किमान दोन बाबी यात्रेच्या ठिकाणांनाही चपखल लागू होतात; मात्र यात्रांची ठिकाणे ग्रामीण भागात मोडत असल्याने त्याचा फायदा संबंधितांना मिळू शकतो. तथापि, ग्रामीण असो वा शहरी, आदेशामध्ये नमूद केलेली परिस्थिती दोन्ही ठिकाणी सारखीच असल्याने धोका दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. ‘गर्दी आणि आवाजाने हत्ती बिथरतो,’ असे स्पष्टपणे म्हटले आहे , हे लक्षात घ्यायला हवे. आदेशात म्हटले आहे की, ‘मुख्य वनसंरक्षकांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील पाळीव हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि शहरांच्या हद्दीत त्यांच्या प्रवेशावर बंदी घालावी. तसेच सबळ कारण असल्याव्यतिरिक्त शहरांच्या हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी हत्ती नेण्यास अटकाव करावा.’ आदेश शहरी भागासाठी असला, तरी परिपत्रकाचा पुढील भाग ग्रामीण भागाच्या विशेषत: यात्रेच्या ठिकाणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो. ‘ज्याने पाळीव हत्तीला हाताळण्याचे प्रशिक्षण घेतलेले नाही, त्याच्या जवळ हत्ती जाणार नाही, याची काळजी हत्तीच्या मालकाने घ्यायची आहे,’ असे आदेशात नमूद केले आहे. परिस्थिती समान असली, तरी केवळ ग्रामीण भाग म्हणून याही नियमातून संबंधितांना अंग काढता येईल. या आदेशान्वये ‘स्थानिक वन अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील पाळीव हत्तींच्या स्थितीवर आणि देखभालीवर नजर ठेवायची आहे. हत्तींशी क्रूरतेचा व्यवहार होत असल्यास कारवाईचे अधिकार स्थानिक वन अधिकाऱ्यांना नसले, तरी तसे आढळल्यास त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा केंद्र सरकारच्या प्राणिकल्याण मंडळाला त्याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच मुख्य वनसंरक्षकांनी (प्रादेशिक) त्या-त्या क्षेत्रातील सहायक वनरक्षक आणि वनक्षेत्रपाल यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावेत आणि त्यांच्या माध्यमातून पाळीव हत्तींवर देखरेख करावी.’ हत्तीच्या धक्क्याने मृत्यू होतो का?पाल यात्रेत हत्ती बिथरल्याने चेंगराचेंगरी झाली असली, तरी अंजना नामदेव कांबळे (वय ६५, रा. कदमवाडी लेबर चाळ, कोल्हापूर) यांचा मृत्यू हत्तीचा धक्का लागून झाला, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. हत्तीचा धक्का लागल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो का, याविषयी जाणकारांशी चर्चा केली असता, माणूस आणि हत्ती यांच्या वजनात बरीच तफावत असल्याने धक्का लागताच अंतर्गत इजा होऊन माणसाचा मृत्यू होऊ शकतो. तथापि, आजूबाजूची परिस्थितीही पोलिसांना पाहावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ही बाब शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर अधिक स्पष्ट होईल, असे मत पडले.
गर्दीने हत्ती बिथरतो!
By admin | Published: January 05, 2015 11:35 PM