कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत दोन्ही कॉग्रेसना चांगले यश मिळाल्याने आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील या पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांचे राजकीय बळही या निकालाने वाढले आहे. आता महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकविणे हेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे लक्ष्य असेल. त्यातही पालकमंत्री सतेज पाटील हे तर जास्तच सक्रिय होतील; कारण महापालिकेतील यशावर त्यांची विधान परिषदेची निवडणूक अवलंबून आहे.
तसा या दोन्ही मतदारसंघांचा थेट महापालिका निवडणुकीशी संबंध येत नाही; परंतु विजयामुळे कार्यकर्त्यांना उभारी येते. पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नेते असे आहेत की ते एकदा निवडणुकीत उतरले की तळापर्यंत जातात व विजय खेचून आणतात. या दोन्ही नेत्यांनी गेले महिनाभर पायाला पाने बांधून प्रचार केला होता. मुश्रीफ तर स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणे सकाळी आठ वाजता पदवीधरचे उमेदवार अरुण लाड यांच्यासाठी मतदान केंद्रावर हात जोडून उभे होते. आता या निवडणुकीत अपेक्षित यश आल्यामुळे दोघेही महापालिकेच्या निवडणुकीतील जोडण्या लावण्यास रिकामे झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतील घडामोडी आता सुरू होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढणे व नंतर सत्तेसाठी एकत्र येणे हा सत्तेचा फॉर्म्युला या वेळेलाही कायम असेल.
(विश्वास पाटील)