जयसिंगपूर : समाजाबरोबर व्यक्ती व देशाच्या विकासासाठी शेतकरी आणि लेखक या घटकाशिवाय पर्याय नाही. दु:खातून सुख देण्याचे सामर्थ्य हे साहित्यातून घडू शकते. शहरापेक्षा ग्रामीण भागातच निसर्गाचे खरे साहित्य लपले असून, साहित्य हेच जगण्याचे बळ असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व संमेलनाध्यक्ष डॉ. द. ता. भोसले यांनी केले.निमशिरगांव (ता. शिरोळ) येथे १८ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते. यावेळी साहित्यरत्न पुरस्कार डॉ. पी. जी. कुलकर्णी, शेतकरी राजा पुरस्कार अनिल पवार यांना प्रदान केला, तर शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांना देण्यात आलेला समाजरत्न पुरस्कार त्यांची कन्या नमिता खोत यांनी स्वीकारला. हे पुरस्कार खासदार शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले. सकाळी नऊ वाजता हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ. सुकुमार मगदूम व डॉ. महावीर अक्कोळे यांच्या उपस्थितीत येथील श्री सिद्धेश्वर मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. दीपप्रज्वलनाने व प्रतिमा पुजनानंतर संमेलनास प्रारंभ झाला. यावेळी साहित्य सुधा स्मरणिका व प्रा. पी. बी. पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. विद्यार्थिनी नेहा पाटील, त्याचबरोबर जवाहर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल भगवान कांबळे, वंदना कुंभोजे, धनपाल आलासे तसेच सागर चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. भोसले म्हणाले, ग्रामीण भागातच उत्कृष्ट साहित्य संमेलने होत आहेत. माणूस भौतिक सुखातच गुरफटला आहे. साहित्यातून जगण्याची नवी उमेद मिळत असल्यामुळे खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आणि साक्षात्कार घडविणाऱ्या साहित्यातून तरुणांनी जोरदार लेखन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.राजू शेट्टी म्हणाले, कसदार लिखाणातून बदलाची प्रेरणा मिळाली पाहिजे. पुस्तके, ग्रंथामुळे परिवर्तन होत आहे. वर्षानुवर्षे शेती करणारा आजचा शेतकरी सरकार नावाच्या या व्यवस्थेमुळे आत्महत्या करीत आहेत. या प्रश्नी निर्भीडपणे लेखन करण्याची गरज आहे. साहित्यातील ही लेखनी चालत राहिली तर निश्चितच शेतकरी जीवनाला दिशा मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वि. दा. आवटी, महावीर अक्कोळे, जि. प.चे सदस्य सुरेश कांबळे, प्रा. सुनंदा शेळके, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, अभिनंदन खोत, सावकार मादनाईक, पी. जी. कुलकर्णी, श्रीधर हेरवाडे, मुकुंद अर्जुनवाडकर, अजित सुतार यांच्यासह मनोज पाटील, सुदर्शन पाटील, गोमटेश पाटील, सरपंच सुनीता पाटील, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता पाटील यांनी केले. साहित्य सुधा मंचचे अध्यक्ष डॉ. जे. ए. पाटील यांनी स्वागत केले. पद्माकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
साहित्यातूनच जगण्याचे बळ
By admin | Published: January 04, 2015 10:21 PM