लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संघर्षाला तोंड देत आव्हाने पेलण्याची ताकद व हिंमत केवळ महिलांमध्येच आहे. तीच धमक दाखवत कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केले.
कोल्हापूर शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर होत्या. रूपालीताई चाकणकर म्हणाल्या, राज्यात सत्ता आपली आहे, त्यांच्या माध्यमातून सामान्य माणसाची कामे करा. घरोघरी जाऊन पक्षाची ध्येयधोरणे पाेहोचवा. सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन लढा द्या, तो प्रश्न जरी सुटला नाहीतरी लोकांचे मतपरिवर्तन होते. आपण काम कसे करतो, यावर मत तयार होत असते. कोल्हापूर शहरात संघटनेची बांधणी चांगली आहे, ती अधिक बळकट करण्यासाठी संपर्क मोहीम राबवा.
जहिदा मुजावर म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य माणसांना महागाईमध्ये होरपळत आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहे. प्रदेश पातळीवर ज्या ज्यावेळी आदेश येईल त्यावेळी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करू.
पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा अश्विनी माने म्हणाले, राज्यात आपले सरकार येऊन दीड-पावणेदोन वर्षे झाली. पक्षासाठी काम करणाऱ्या महिलांना संधी दिली जात नाही. राज्य पातळीवर राहू दे किमान शहरातील विविध कमिट्यांवर तरी संधी द्या. महिला उपाध्यक्षा शीतल तिवडे, सुनीता राऊत आदी उपस्थित होते. या वेळी महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
समित्या, महामंडळावर महिलांना संधी देणार
राज्यातील शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या नावांच्या याद्या उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्या आहेत. आगामी काळात समित्या व महामंडळांवर अधिकाधिक महिलांना संधी देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे रूपालीताई चाकणकर यांनी सांगितले.
फोटो ओळी : राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कोल्हापूर शहर पदाधिकारी आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी मार्गदर्शक केले. या वेळी अश्विनी माने, जहिदा मुजावर, सुनीता राऊत, शीतल तिवडे उपस्थित हाेत्या. (फोटो-१३०७२०२१-कोल-एनसीपी) (छाया- नसीर अत्तार)