बांबवडे : आर्थिक सुबत्ता आली की, माणसाच्या संवेदना बोथट होताना दिसतात; परंतु शिव शाहू महाविद्यालय, सरूड (ता. शाहूवाडी)च्या मराठी विभागप्रमुख डॉ. एम. आर. पाटील याला मात्र अपवाद आहेत. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या वाडीचरण येथील वर्षा कुंभार हिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून सामाजिक बांधीलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
वाडीचरण येथील एक मोलमजुरी करून गुजराण करणारे कुंभार कुटुंब. दारिद्र्याचा अभिशाप घेऊन या कुटुंबात वर्षाचा जन्म झाला. ही वर्षा लहानपणी आईच्या मायेला पोरकी झाली. यातच भर म्हणून कालांतराने काळाच्या ओघात नियतीने पितृत्वदेखील हिरावून घेतले. ही वर्षा कुंभार सध्या सरूडमध्ये इंदिरा गांधी हायस्कूल, सरूड या शाळेत सातवीच्या वर्गात शिकत आहे. मोठा भाऊ अर्धवट शिक्षण सोडून कुटुंबाला जमेल तेवढा हातभार लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो.
काठीच्या आधाराने जगणारे आजी-आजोबा हीच घरची संपत्ती; परंतु मुळातच अभ्यास करून अपार कष्टाच्या जोरावर मोठे स्वप्नं मनाशी कवटाळून वर्षा शालेय स्तरावर सदैव पुढे आहे. आजारपण घेऊन घरात बसून असणारे वृद्ध आजोबा आणि दररोज रोजगार करणारी आजी वर्षाच्या स्वप्नांना प्रयत्नांचे खतपाणी घालत आहेत. येणारा प्रत्येक दिवस वर्षाच्या आजीसाठी नवीन समस्या घेऊनच उगवतो. चार माणसांचे कुटुंब अगदी वृद्ध वयात ती सांभाळत आहे.
या आजीच्या कष्टावर पोटाची भूक कशीतरी भागविली जाते. शिक्षण, आरोग्य, कपडे या गरजा भागविताना नाकीनऊ येते. कुणाकडून अभिलाषा करावी तर स्वाभिमान आडवा येतो. घरात कर्ता माणूस नसल्याने घर आ वासून खायला उठते.
अशा वर्षाची करून कहाणी पाटील यांना समजताच त्यांनी वर्षाचे मुख्याध्यापक के. आर. रोडे यांच्याशी संपर्क साधून वर्षाचे भविष्य व आयुष्य बदलण्याची मनीषा व्यक्त केली. कारण डॉ. एम. आर. पाटील या सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. समाज परिवर्तनासाठी त्यांनी अनेक व्याख्याने व प्रवचने दिली आहेत. तसेच कुसंगतीने वाहत जाणाऱ्या युवक-युवतींना योग्य दिशा देण्यातही त्या नेहमी अग्रेसर असतात. म्हणूनच वर्षाला शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
शाळेची परवानगी, आजी-आजोबांचे मत जाणून घेऊन त्यांनी वर्षा हिची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तिने ठरविलेल्या करिअरची सर्व जबाबदारी घेऊन त्यांनी इतरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. वर्षा तिच्या इच्छेनुसार जे शिक्षण घेईल, मग ते डॉक्टर, इंजिनिअर असो वा कोणतेही त्यासाठीचा सर्व खर्च पाटील या स्वत: करणार असल्याने निराधार वर्षाच्या जीवनाला नवा मार्ग मिळाला आहे. त्याचबरोबर मातृत्वाचेही प्रेम तिला मिळाले असून, वर्षाच्या आयुष्यातील शिक्षणाचे अवघड गणित सुटले आहे.