कोल्हापूर : धडकी भरविणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर सीमाभागातील मराठा समाजबांधवांना एक स्फूर्ती मिळाली आहे. साठ वर्षे चाललेल्या सीमालढ्यास या मोर्चामुळे पाठबळ मिळणार आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील तीस हजार मराठा बांधव येत्या शनिवारी कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होतील. कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी दसरा चौक येथील सकल मराठा समाजास पाठिंबा दिला. दळवी म्हणाले, ज्या पद्धतीने मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकवटलेला आहे, त्याप्रमाणे सरकारला मराठा आरक्षण द्यावे लागेल. या मोर्चासाठी बेळगावमधून किमान तीस हजार मराठाबांधव येतील. यासह बेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. आम्ही सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊ. तेथून शिवाजी विद्यापीठमार्गे ताराराणी चौकात सामील होऊ. या मोर्चात आमच्या सीमालढ्याचे फलक असणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठा समाजात जागृतीचे काम सुरू होते. आता मराठा मूक मोर्चाच्या रूपातून पुन्हा एकदा ताकद दिसून आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सीमालढा न्यायमार्गाने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चाच्यावतीने शनिवारी राज्य शासनाला जे मागण्यांचे निवेदन केले जाणार आहे, त्यामध्ये सीमाप्रश्न सोडविण्याच्याही मागणीचा उल्लेख करा, असे निवेदन वसंत मुळीक यांना दिले. मधल्या काळात सीमाभागात मराठा समाज वाऱ्यावर सोडल्याचे चित्र होते; पण पुन्हा या एकीमुळे सर्व मराठा समाजबांधवांमध्ये चैतन्य पसरले आहे. यावेळी समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका समिती अध्यक्ष नागोजी हुद्दार, मराठा समाज सुधारणा समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ८६५ गावचे लोकबेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊन नंतर कोल्हापूरकडे रवाना होणार
मराठा मोर्चामुळे सीमालढ्यास बळ
By admin | Published: October 11, 2016 12:49 AM