कोल्हापूर : प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पंचगंगा घाटासह शहरातील तलावात जनावरे धुण्यासाठी बंदी घातली आहे. असे कृत्य केल्यास थेट फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलीस प्रशासनाचा शनिवारी सकाळपासून पंचगंगा घाट येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यामुळे सायंकाळी पाच वाजता जनावरे धुण्यासाठी आलेले नागरिक आक्रमक झाले. अचानक बंदी घातल्यावरून त्यांनी पोलीस, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण होते.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी सकाळपासूनच पंचगंगा घाटावर नदीकडे जाणारा मार्ग बॅरिकेटस लावून बंद केला आहे. यामुळे जनावरे घेऊन आलेले गोपी केसरकर, अक्षय राबाडे, सुरेश रोटे, सिद्धापा गवळी, अवधूत सावंत, नवनाथ गवळी, बिंदू राबाडे, दिलीप राबाडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पर्याय देत नाही तोपर्यंत पाणी पिण्यासाठी तरी आत सोडण्यास परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. अधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आदेश असल्याने सोडता येत नसल्याचे म्हटले.कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदीत जनावरे धुण्यासाठी बंदी घातली आहे. येथे शनिवारी सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला असून, बॅरिकेट्स लावून नदीकडील मार्ग बंद केला. यामुळे जनावरांसह त्यांचे मालक येथे थांबू्न होते.