कुरुंदवाड : फेसबुक अकाउंटवरील आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी येथील पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दत्तवाड व कुरुंदवाड येथे घडलेल्या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. तसेच लवकरच अवैध व्यवसायांचा बीमोड करणार असल्याची माहिती माहिती जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे येथील पोलीस ठाण्यात पत्रकारांना दिली.
बलकवडे म्हणाले, आक्षेपार्ह मजकुराबाबत तपास सुरू आहे. कोरोना जमावबंदी असताना एकत्रित निर्माण झालेल्या जमावाचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. जिल्ह्यात ११ मार्चपासून अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत पोलीस प्रशासनाला उत्तम यश मिळाले आहे. ही मोहीम अधिक तीव्र करून कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व अवैध व्यवसायांचा बीमोड करणार असल्याचे सांगत हद्दपारीबाबत सध्या सुरू असलेल्या प्रक्रिया गतिमान केल्या असून, नागरिकांच्या अपेक्षेपेक्षाही जादा कारवाया करून अवैध व्यवसाय व गुंडगिरी मोडीत काढणार असल्याचे पोलीसप्रमुख बलकवडे यांनी सांगितले.
दत्तवाड आणि कुरुंदवाड प्रकरणाने कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीसदल राबत आहे. या दोन ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता त्याचा प्रसार आणि प्रचार करू नका, असे आवाहनही बलकवडे यांनी यावेळी केले.