: नगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त पथके तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर सोमवारी नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. खरेदी व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने अनावश्यक गर्दी होत होती. त्यामुळे या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील काळात कडक भूमिका घेत कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले.
सकाळी सात ते अकरा या वेळेत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार केवळ अत्यावश्यक आस्थापने सुरू राहणार आहेत. या ठिकाणचीदेखील पाहणी करून कोरोना नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. अत्यावश्यक व्यतिरिक्त अन्य आस्थापने सुरू राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्यात येणार आहे, तसेच विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
प्रशासनाने ठरवून दिलेल्या २२ ठिकाणीच आखून दिलेल्या चौकोनात बसून भाजीपाला व फळफळावळ यांची विक्री करता येणार आहे. तसे न आढळल्यास साहित्य जप्त करण्यात येणार आहे, तसेच नगरपालिका प्रशासकीय वॉर्ड क्रमांकानुसार सम व विषम तारखेला भागातील यंत्रमाग आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
घरपोच भाजीपाला देणाºयांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील मुख्य चौकात डिजिटल फलकावर लॅब टेस्टची यादी व दर याची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही खरात यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, अपर तहसीलदार दीपक पाटील उपस्थित होते.