म्हासुर्ली दि.३ वार्ताहर - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून सुरू असणाऱ्या म्हासुर्ली ते कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) या मुख्य रस्त्याचे कार्पेटिंगचे अत्यंत निकृष्ट पद्धतीने ठेकेदाराने सुरू केलेले काम आक्रमक ग्रामस्थांनी मंगळवारी बंद पाडले. संबंधित विभागाने कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या बाबत ‘लोकमत’मधील प्रसिद्ध झालेल्या बातमीची तत्काळ दखल घेत राधानगरीचे आ. प्रकाश आबिटकर यांनी या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच ठेकेदाराचे बिल थांबविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहेत.
म्हासुर्ली-कोनोली हा चार किमीचा रस्ता आ. आबिटकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन वर्षांपूर्वी मंजूर केला. या मुख्य मार्गावरील चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तीन वर्षांपूर्वी सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर झाले. रस्त्याच्या रुंदीकरण, मजबुतीकरण, खडीकरणासह डांबरीकरणाचे काम कोल्हापुरातील निर्माण कन्स्ट्रक्शनकडून गेल्या तीन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. गेल्या तीन वर्षात फक्त रुंदीकरण खडीकरण व मजबुतीकरण झाले. प्रलंबित कार्पेटिंग व सीलकोटचे काम दर्जेदार होणे आवश्यक असताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सोमवारपासून ठेकेदाराने कारपेंटिंगचे काम रस्त्यावरील धूळ बाजूला न करताच तसेच योग्य जाडी न करता अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम सुरू केले. परवा केलेले काम काल उखडून गेले असून हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले. मुळात नियमानुसार पंधरा मे नंतर रस्त्याचे काम करता येत नसतानाही अधिकाऱ्यांच्या मर्जीमुळे ठेकेदाराने कामास सुरुवात केली.
प्रतिक्रिया....
रस्त्याची सखोल चौकशी करून, ठेकेदाराचे बिल थांबवावे, तसेच संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावर व संबंधीत सर्व शासकीय यंत्रणेतील दोषी अधिकारी, कर्मचा-यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली आहे.
- आमदार प्रकाश आबिटकर