उदगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्रीपासून अनावश्यक प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हाबंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कडक अंमलबजावणी उदगाव (ता. शिरोळ) येथील चेक पोस्टवर दिसून आली. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व वाहनांना उदगाव नाक्यावरून परत पाठविण्यात आले. त्यामुळे जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी होताना दिसून येत आहे. या परिस्थितीची अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला सूचना दिल्या.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याची उपाययोजना शुक्रवारी सकाळपासून जयसिंगपूर पोलीस ठाण्याने कडकपणे राबविली. वीस ते पंचवीस पोलीस, बॅरिकेट्स, बेकर व्हॅन, अॅब्युलन्स, तीन पोलीस व्हॅन यांसह मोठा फौजफाटा उदगाव नाक्यावर तैनात होता.
सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीला दवाखाना, शासकीय नोकरी व शासनाने सूट दिलेली कारणे सोडून इतर कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये अनावश्यक प्रवेश करणाऱ्यांची हयगय करू नका, असे स्पष्ट बजावले. तसेच उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी दवाखाना व इतर सूट असलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करूनच प्रवेश द्यावा, असे सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
------------------
चौकट -
दवाखान्याची कारणे नित्याचीच
दोन जिल्ह्यांची सीमा असल्याने खासगी कामे करणाऱ्या कामगारांना अडचण झाली आह, तर जास्तीत जास्त नागरिक हे दवाखान्याची कारणे सांगून प्रवेश मिळवित आहेत. काहींची कारणे ही, शेती नदीपलीकडे आहे, अशी आहेत. या सर्व कारणांमुळे पोलिसांची पंचाईत होत आहे.
--------------------
कोट -
नागरिकांनी शासनाच्या नियमावलींचे योग्य पालन करावे. अत्यावश्यक कारणे वगळता इतर कोणत्याही कारणाने प्रवेश दिला जाणार नाही. अनावश्यक कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना परत माघारी फिरावे लागेल.
- दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलीस निरीक्षक, जयसिंगपूर
फोटो - २३०४२०२१-जेएवाय-०५, ०६ फोटो ओळ -
उदगाव (ता. शिरोळ) येथील चेकपोस्टवर बॅरिकेट्स लावण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना कागदपत्रांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. (छाया-अजित चौगुले, उदगाव)