लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची शहरामध्ये दुसऱ्या दिवशीही कडक अंमलबजावणी करण्यात आली. बंदच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी कायम असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही ठिकाणी काही आस्थापना अर्धे शटर उघडून सुरू होत्या.
शहरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. प्रतिदिन पंधरा ते अठरा रुग्ण आढळत आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. बुधवारी (दि. ७) नगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर आस्थापना बंद केल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कमी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. त्यामुळे गुरुवारपासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हार्डवेअर, फर्निचर, स्टेशनरी व इतर अनेक दुकाने दिवसभर बंद होती. बहुतांश सलूनही बंदच होती. काही व्यावसायिकांनी अर्धे शटर उघडून ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली होती. त्यांनीही दुपारनंतर दुकाने बंद केली.
चौकट
यंत्रमाग कारखाने सुरू, मात्र पूरक व्यवसाय बंद
इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून, येथील प्रमुख उद्योग हा यंत्रमाग व्यवसाय आहे. त्यामुळे प्रशासनाने शहर व परिसरातील यंत्रमाग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या व्यवसायाशी निगडित पूरक व्यवसाय काही प्रमाणात बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कारखाना धारकांची चांगलीच दमछाक झाली.
बांधकामाला परवानगी ; परंतु पूरक व्यवसाय बंद
शहर परिसरात काही ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. शासनाने या कामाला परवानगी दिली असली तरी, त्यासाठी लागणारे पूरक व्यवसाय सॅनिटरी वेअर, हार्डवेअर, ट्रेडर्स बंद असल्याने साहित्य मिळत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत.
फोटो ओळी
०८०४२०२१-आयसीएच-०३
०८०४२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत मुख्य मार्गावरील दुकाने व मॉल बंद झाल्याने शुकशुकाट होता.