राज्याच्या काही भागात कोरोना विषाणूंनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काही शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यापूर्वीच्या राज्य व केंद्र सरकारच्या निर्देशाचे कडक पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरात बुधवारपासून विना मास्क फिरणाऱ्या १८० व्यक्तींवर प्रत्येकी शंभर रुपये, शारीरिक अंतर न राखणाऱ्या ११ व्यक्तींवर प्रत्येकी ५०० रुपये, तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकणाऱ्या तीन व्यक्तींवर प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे सुमारे २३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. इस्टेट अधिकारी सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात पाच पथके कार्यरत असून, गर्दीच्या ठिकाणी, प्रमुख चौकात थांबून कारवाई केली जात आहे.
दरम्यान, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांची बैठक घेऊन केंद्र सरकारच्या निर्देशाची कडक अंमलबजावणी करावी, कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आदींबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
४६७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस-
कोल्हापूर शहरात बुधवारी ४६७ महापालिका कर्मचाऱ्यांना, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. आतापर्यंत आरोग्य सेवेतील ६६३५, तर आघाडीवर काम केलेल्या महापालिकेच्या १४१६ कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली असल्याचे डॉ. पोळ यांनी सांगितले.