राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चा निर्णय घेतला. त्याला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी निर्णयाचे काटेकोर पालन केले. नागरिकांनी स्वतःहून वीकेंड लॉकडाऊनला पाठिंबा देत, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवल्या.
शहरातील छत्रपती शाहू महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, के.एल. मलाबदे चौक, गांधी पुतळा, राजवाडा चौक या नेहमी गजबजलेल्या ठिकाणी नीरव शांतता पसरली होती. प्रमुख बसस्थानक परिसरातही शुकशुकाट दिसत होता. महामंडळाने सर्व फेऱ्या रद्द केल्या होत्या. यावेळी पोलिसांनी शहरातील मुख्य चौकात कडक बंदोबस्त ठेवला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांना अडवून पोलीस चौकशी करत होते. काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, खाऊ गल्लीत शांतता होती. शहरातील मोकळ्या जागेत, शाळेच्या मैदानावर व रस्त्यावर लहान मुले खेळत होती. पोलिसांनी पेट्रोलिंग करत शहरात गस्त घातली.
चौकट
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट
वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरास भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
घरात राहूनच वीकेंड साजरा
शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे शुक्रवारीच नागरिकांची किराणा माल खरेदीसाठी लगबग सुरू होती. अनेकांनी घरातच बसून परिवारासोबत लॉकडाऊन साजरा केला. चांगल्या मेजवानीसह गप्पागोष्टींत वीकेंड दिनक्रम पार पडला.