:कॅमेऱ्याचीही राहणार नजर
: नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठिकठिकाणी मास्क तपासणी, खासगी व सरकारी आस्थापनांची तपासणी अचानक भेट देऊन करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल, नगरपालिका व पोलीस यांचे संयुक्त पथक व्हिडिओ कॅमेऱ्यांसह कार्यरत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात सुरुवातीलाच चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने प्रांत कार्यालयात उपाययोजनांसंदर्भात सोमवारी बैठक झाली. यावेळी आ. प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत नव्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत आ. आवाडे यांनी चिंता व्यक्त केली, तसेच नागरिकांनी स्वत:सह परिवाराची व समाजातील अन्य घटकांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
महसूल, नगरपालिका, पोलीस दल, आरोग्य विभाग यांची संयुक्तपणे विविध पथके निर्माण करून त्या माध्यमातून शहरातील आस्थापना तपासणी विनापरवाना शाळा, कोचिंग क्लास, मंगल कार्यालये, आदी ठिकाणी तपासणीची मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमबाह्य वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. व्हिडिओ कॅमेरे, तसेच मोबाइलवरून मिळालेल्या क्लिपवरूनही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे तिसऱ्या डोळ्याचे सर्वत्र लक्ष राहणार असून, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला प्रभारी मुख्याधिकारी तथा अपर तहसीलदार शरद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, नंदकुमार मोरे, इकबाल महात आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२२०२२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. प्रकाश आवाडे, प्रभारी मुख्याधिकारी तथा अपर तहसीलदार शरद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, नंदकुमार मोरे, इकबाल महात, आदी उपस्थित होते.
छाया-उत्तम पाटील