कोल्हापूर : कोरोनामुळे निवडणूक स्थगितीच्या सुनावणीची तलवार डोक्यावर असताना आता कडक लॉकडाऊनने ‘गोकुळ’च्या प्रचारात विघ्न आणले आहे. जिल्हा प्रशासनाने तालुकांतर्गत प्रवासालाही बंदी घातल्याने संपूर्ण जिल्हाभर विखुरलेल्या मतदारांसमोर जायचे कसे, प्रचार करायचा कसा, असा नवीनच प्रश्न उमेदवारांसमोर उभा ठाकला आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक आधी महापूर, त्यानंतर कोरोनामुळे सातत्याने पुढे पुढे सरकत गेली. अखेर राज्य सरकारने ठाम भूमिका घेत दोन महिन्यांपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून प्रक्रियाही सुरू केली. त्यानुसार २ मे रोजी मतदान आणि ४ मे रोजी निकाल याप्रमाणे यंत्रणाही कामाला लागली. दोन दिवसांपूर्वी पॅनेल व उमेदवार निश्चित होऊन प्रचाराचे नारळ फुटले. याला एक दिवस उलटत नाही ताेवर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गुरुवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. याअंतर्गत आधी जिल्हांतर्गत असणाऱ्या बंदीचा विस्तार वाढवून तो तालुकांतर्गत करत असल्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली. एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात गेल्यास कारवाई होणार असल्याने ‘गोकुळ’च्या प्रचारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘गोकुळ’चे मतदार असलेले साडेतीन हजार ठरावधारक संपूर्ण जिल्हाभर विखुरले आहेत. मतदान हे पूर्ण जिल्ह्याचा उमेदवार गृहीत धरून केले जाते. त्यामुळे मतदार असलेल्या प्रत्येक ठरावधारकाची भेट उमेदवाराला घ्यावीच लागते. आता तालुकांतर्गत बंदीमुळे या उमेदवार भेटीवरच मर्यादा आल्या आहेत. आधीच दोन्हीकडील तगड्या पॅनलमुळे यावेळची निवडणूक अटीतटीची होणार असल्याने ठरावधारकांची पळवापळवीही होणारच आहे. त्याची दक्षता आतापासून घेतली जात असून काही ठरावधारकांना अज्ञातस्थळीही नेले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊन लागल्याने मोठ्या संख्येने या ठरावधारकांना एकत्रित देखील ठेवण्याची मुभा असणार नाही. शेजारच्या राज्यांमध्ये पाठवायचे म्हटले तरी तेथेही कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने पॅनलच्या प्रमुखांसमोर ठरावधारकांना सांभाळण्याचे मोठे दिव्य उभे ठाकले आहे.