शिरोळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने अधिक कडक निर्बंध घातले आहेत. मार्गदर्शक सूचनांव्दारे नियम लागू करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहिल्यादिवशी नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जयसिंगपूर, शिरोळसह तालुक्यात सकाळी अकरानंतर कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शिवाय, शासकीय कार्यालयात देखील शुकशुकाट आहे.
दरम्यान, उदगाव-अंकली नाक्यावर वाहतुकीस कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या नव्या नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ ही वेळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. असे असले तरी या चार तासांच्या वेळेत शहरातील नववी गल्ली ते बारावी गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती; तर काही किराणा दुकानात ११ च्या सुमारास खरेदीसाठी गर्दी दिसून आली. लॉकडाऊनचे नवीन नियम करण्यात आले असले तरी सकाळच्या सत्रात गर्दी रस्त्यावर दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही.
कडक लॉकडाऊनचा पहिला दिवस असल्याने शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र दिसत होते; तर कार्यालयात पंधरा टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सकाळी अकरानंतर शासकीय कार्यालयीन कामकाजास सुरुवात होते. मात्र, अकरानंतर कडक बंद असल्याने कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता, तर शिरोळ, कुरुंदवाडमध्ये पोलिसांनी अकराच्या सुमारास व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
फोटो - २३०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कडक लॉकडाऊनमुळे शिरोळ येथील प्रशासकीय कार्यालयासमोर शुकशुकाट होता. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)