कागल :
कागल तालुक्यात कोरोनाची परिस्थिती पाहता रविवारपासून (दि.९) बुधवारपर्यंत (दि.१९) दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सक्त सूचना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. ज्या तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहेत, त्या तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यू कडक करा, कुणालाही बाहेर पडू देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
कागलमध्ये कोरोनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, या दहा दिवसांच्या काळात दूध व औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तसेच पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवांना पेट्रोल देण्यासाठी सकाळीच सुरू राहतील. तालुक्यातील कसबा सांगाव, मौजे सांगाव, व्हन्नूर व वंदूर या गावांमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे. या गावांना रेड अलर्ट एरिया जाहीर करून अँटिजन व आरटीपीसीआर टेस्टसह लसीकरणही वाढवा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गंभीर धोका घराघरांपर्यंत पोहोचला आहे. दवाखान्यांमध्ये बेडसह औषधांचीही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पाटील, मुख्याधिकारी पंडित पाटील , संजय गायकवाड, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. नवनाथ मगदूम, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, विकास बडवे, आप्पासाहेब माळी, सुनील माळी, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. पल्लवी तारळकर उपस्थित होते.
चौकट
कागलमध्ये ऑक्सिजन प्रकल्प
मंत्री मुश्रीफ म्हणाले की तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी गडहिंग्लजच्या धर्तीवर लवकरच कागलमध्येही ऑक्सिजन प्रकल्प व एचआरसीटी स्कॅन यंत्रणाही कार्यान्वित करणार आहे.