लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून देशाच्या तुलनेत येथे मृत्यूदरही जास्त आहे. आता कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नसून आमच्याकडील सर्व साधन सामुग्री संपल्याने येत्या दोन दिवसात जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले जाईल. यामध्ये दूध व मेडिकल सोडून सगळे व्यवहार किमान चौदा दिवस पूर्णपणे बंद राहतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यातही गेल्या सात-आठ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यावरच आताच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे पहिल्या लाटेपेक्षा विषाणूची ताकद अधिक आहे. त्याचा फैलाव लगेच होऊन दोन-तीन दिवसातच रुग्ण अत्यवस्थ होतो. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तरुण मुले मृत्युमुखी पडत आहेत. एकूणच परिस्थिती चिंताजनक असून पालकमंत्री सतेज पाटील आज मंगळवारी आल्यानंतर दहा की चौदा दिवसांच्या लॉकडाऊनवर अंतिम निर्णय घेतला जाईल. दूध व मेडिकल सोडून कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘गोकुळ’ निवडणुकीनंतर लॉकडाऊन गरजेचा होता
‘गोकुळ’ची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कडक लॉकडाऊनची तयारी आम्ही केली होती. सोशल मीडियातून त्यावर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर निर्णय मागेे घेतला; मात्र त्यावेळी लॉकडाऊन केले असते तर आज परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असती. टीकेकडे लक्ष न देता, निर्णय घेणे अपेक्षित होते, मी कागलमध्ये कडक लॉकडाऊन टाकल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
टास्क फोर्स आज कोल्हापुरात
बाहेरील जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत आहेत, ते वेळेत येत नसल्याने त्यातून मृत्यू वाढत आहेत. तरीही त्याचा अभ्यास करण्यासाठी
तातडीने टास्क फोर्स पाठवण्याबाबत विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याशी बोललो आहे. आज, टास्क फाेर्स येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका
महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले. त्याबाबतही आपली तयारी सुरू असून लहान मुलांसाठी व्हेंटिलेटरसह इतर तयारी करण्याची सूचना दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
औषध पुरवठ्यासाठी राजेश टोपेंशी संपर्क
जिल्ह्याला रेमडेसिविर, ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरेसा पुरवठा करावा, यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.