कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक शासनाने सोमवारी (दि. १०)पासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे. निपाणी शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या लाॅकडाऊनला नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही निपाणीत शुकशुकाट पसरला होता. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. यामुळे प्रशासनावरचे दडपण काहीअंशी कमी झाले आहे.
शहर आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, प्रशासनाने योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे. सकाळी ६ ते १० पर्यंत बाजारासाठी मुभा दिली असून, या वेळेतच किराणा साहित्य, भाजीपाला, दूध विक्री, फळे विक्री, तसेच अन्य जीवनावश्यक साहित्यांच्या दुकानांना परवानगी दिली आहे. धर्मवीर संभाजीराजे चौक, अकोळ क्रॉस, मुरगूड रोड, बेळगाव नाका, महात्मा बसवेश्वर चौक न अन्य ठिकाणी पोलिसांनी थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी चालविली आहे. पोलिसांच्या कारवाईला घाबरून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. मंडल पोलीस निरीक्षक आय. एस. गुरुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिता राठोड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी. एस. तळवार व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला आहे.
ऑक्सिजनची कमतरता
निपाणी शहरात सध्या सहा कोरोना केअर सेंटर आहेत; पण या ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे काही रुग्णांना सांगितले आहे. शिरगुप्पी येथील एका महिला रुग्णास बुधवारी ऑक्सिजन बेडची आवश्यकता असताना एकाही कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड मिळाला नाही. परिणामी महिला रुग्णास महाराष्ट्रातील रुग्णालयात दाखल केले.
फोटो
निपाणी : बुधवारी निपाणीत कडकडीत लॉकडाऊन असल्याने शुकशुकाट पसरला होता.