हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील अधिकारी-पदाधिकाऱ्यांची बैठक
इचलकरंजी : कोरोना संसर्गामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इचलकरंजी शहरातील मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. लॉकडाऊन लागू करूनही नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे, असे मत प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी व्यक्त केले. कोरोना संदर्भात ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. साठ वर्षांवरील नागरिकांना व व्याधीग्रस्तांना लसीसाठी प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, सर्व समाज भवन, मंगल कार्यालये, शाळा व सार्वजनिक हॉल ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे खरात यांनी सांगितले.
अनेक नागरिक खासगी हॉस्पिटलमध्ये चाचणी करून घेत असून पॉझिटिव्ह आल्यास स्वतः गृह विलगीकरण होतात. त्यामुळे गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक दवाखान्यात रुग्णांची माहिती घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक नेमण्यात येणार आहे. काँटॅक्ट ट्रेसिंगवरही भर दिला जाणार आहे. या बैठकीस दोन्ही तालुक्यातील नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे लोकप्रतिनिधी, शासकीय व वैद्यकीय अधिकारी तसेच इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.
चौकट
कामकाजाची करणार पाहणी
शहर व परिसरातील कर्मचारी यांच्याकडून कोरोना संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर राहणार नाही. तसेच कोरोना काळात निर्माण केलेल्या समित्यांचीही माहिती घेतली जाणार आहे.
(फोटो ओळी)
इचलकरंजी प्रांत कार्यालयातून प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील प्रमुखांची व्हिडीओ कॉन्स्फरिंगद्वारे बैठक घेतली.