कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाची उघडीप राहिली. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाची भुरभुर होती. मात्र त्यानंतर पूर्णपणे उसंत घेतली. दिवसभरात ऊन राहिले असून धरणक्षेत्रातही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. गौरी-गणपतीच्या काळात खरपाट (कडकडीत ऊन) पडते, त्याची सुरुवात झाली असून, खरीप पिकांना हे वातावरण पोषक मानले जाते.जिल्ह्यात गेली तीन आठवडे एकसारखा पाऊस राहिला. त्यामुळे माणसांबरोबर पिकेही आकसून गेली आहेत. मात्र दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही तालुक्यांत अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहतात. मात्र लगेचच उघडीप राहते.
बुधवारी सकाळी दहानंतर उघडीप राहिली. दिवसभरात कडकडीत ऊन होते. गौरी-गणपतीच्या काळात अशा प्रकारचे ह्यखरपाटह्ण पडते. दोन-अडीच महिन्यांच्या पावसानंतर या कालावधीत हमखास पाऊस थांबतो आणि हे वातावरण खरीप पिकांना पोषक असते.बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १.७६ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ६.६७ मिलिमीटर पावसाची नोंद शाहूवाडी तालुक्यात झाली. धरणक्षेत्रातही पाऊस पूर्णपणे थांबला असून वीजनिर्मितीसाठीच विसर्ग सुरू आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४००, वारणातून १३५४, तर दूधगंगेतून १४०० घनफूट विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटांपर्यंत खाली आली असून अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा -राधानगरी ( ८.२२), तुळशी (३.३९), वारणा ( ३२.५९), दूधगंगा ( २४.७९), कासारी ( २.७२), कडवी ( २.५२), कुंभी ( २.५७), पाटगाव ( ३.७२).