पालिका सनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय
इचलकरंजी : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी सकाळी अकरापासून ते रविवार (दि.१६) सकाळी सातपर्यंत कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दूध व मेडिकल सेवा वगळता यंत्रमाग कारखान्यांसह सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या सनियंत्रण समिती बैठकीत एकमताने घेण्यात आला.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, ठिकठिकाणी भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत. जिल्ह्यातील इतर ठिकाणी शंभर टक्के लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातही कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी नगरपालिकेत बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक राहुल खंजिरे, मदन कारंडे, संजय कांबळे, शशांक बावचकर, भाऊसाहेब आवळे, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, नितीन कोकणे, महादेव गौड, आदी उपस्थित होते.
चौकट
सहा केंद्रांवरच लस
शहरात ४५ वर्षावरील लोकांना लसीकरण सुरू आहे. १२०० ते १६०० लसीचे डोस मिळत असून, दररोज २०० ते ३०० लसीचे डोस प्रत्येक केंद्रावर मिळत आहे. पूर्णपणे लसीचा पुरवठा शासनामार्फत होत नाही, तोपर्यंत सहाच केंद्रे सुरू राहतील, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.
फोटो ओळी
१००५२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने जनता कर्फ्यूबाबत सोमवारी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
छाया-उत्तम पाटील