कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते; तर शनिवारी सकाळपासून शिरोली, नागाव, मौजे वडगाव, टोप, संभापूर, कासारवाडी परिसरात शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता खाद्यपदार्थ, किराणा मालाची दुकाने, ऑटोमोबाईल, बेकरीसह सर्व दुकाने बंद होती. तसेच राष्ट्रीय महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती. परिणामी वीकेंड लॉकडाऊनच्यानिमित्ताने गेल्यावर्षीच्या कडक लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या असून, नागरिक काळजी घेताना दिसत आहेत.
शिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. तर लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नका, असे आवाहन शिरोली ग्रामपंचायत प्रशासनाकडून केले जात आहे.
फोटो ओळी
वीकेंड लाॅकडाऊन काळात शिरोली फाटा येथील चौकात शुकशुकाट.