कोल्हापूर : दिवसा सेंट्रिंग काम आणि रात्री लूटमार करणाऱ्या जिल्ह्यातील सहाजणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून कार, दुचाकी, ४५ मोबाईल हॅँडसेट, आठ तलवारी, रोख रक्कम असा सुमारे दहा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. टोळीतील आणखी दोन साथीदार पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.संशयित म्होरक्या आशिष हणमंत गायकवाड (वय २३), राज अंजुम मुल्ला (१९), शंकर सुनील गायकवाड (१९, तिघे रा. राजेंद्रनगर), प्रकाश शांताराम कोकाटे (१९, मोतीनगर, कोल्हापूर), तुषार रवींद्र लोहार (२०, रा. चोकाक, ता. हातकणंगले), सुभाष विष्णू पाटील (२७, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यांचे आणखी दोन साथीदार पसार आहेत.शिरोली एम. आय. डी. सी. येथे २६ आॅक्टोबरला कारखान्यातून घरी जाणारा परप्रांतीय कामगार राजेशकुमार पाल याला सहाजणांच्या टोळीने रात्री साडेनऊच्या सुमारास रस्त्यात अडवून, तलवारीचा धाक दाखवून मोबाईल, चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला होता. हा गुन्हा राजारामपुरी येथील एका सक्रिय टोळीने केल्याची माहिती हवालदार संतोष माने यांना मिळाली होती.
ही टोळी कार (एमएच ०९ एस - ९५२२) मधून राजाराम तलाव परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पथके रवाना करून सापळा लावला असता राजाराम तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूचुंबकत्व संस्थेसमोर कारमधून आलेल्या सहाजणांना पकडले.
कारची झडती घेतली असता त्यामध्ये आठ तलवारी, कापडात बांधलेले मोबाईल हॅँडसेटचे गाठोडे, पाकीट आढळून आले. पाच हजार ते चाळीस हजार किमतीचे मोबाईल गाठोड्यात दिसून आले. कामगार पाल यांचे आधारकार्डही आढळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या टोळीचे म्होरके आशिष गायकवाड आणि प्रकाश कोकाटे असल्याचे निष्पन्न झाले.
दिवसभर सेंट्रिंग काम करायचे; त्यानंतर चोरून आणलेल्या कारमधून ते गोकुळ शिरगाव, शिरोली एम. आय. डी. सी. इचलकरंजी, शिवाजी विद्यापीठ परिसरातील परप्रांतीय कामगारांना तलवारीचा धाक दाखवून लूटमार करीत असत. आतापर्यंत त्यांची चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सर्वजण आठवीपर्यंत शाळा शिकले आहेत. आई-वडील मोजमजुरी करतात. चैनी, मौजमजा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी ते सेंट्रिंग कामानंतर रात्री लूटमार करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अंगाला हात लावायचा नाय!संशयित प्रकाश कोकाटे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करते. हा टोळीचा म्होरक्या असल्याने पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो ‘अंगाला हात लावायचा नाय...!’ अशी पोलिसांनाच दमदाटी करू लागला. शरीराने सडपातळ असलेल्या या म्होरक्याला अजून मिसरूडही फुटलेली नाही. त्याच्या अंगातील गुन्हेगारीचा माज पोलिसांनी खाकी प्रसादाने उतरविला.