मलकापूर : महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, औरंगाबाद या तीन झोनमधील एसटी आगारातील स्वच्छतेचे कंत्राट ब्रिक्स इंडिया कंपनी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे एसटीमध्ये स्वच्छक या पदावर काम करणाºया कर्मचाºयांवर टांगती तलवार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील एसटीच्या आगारात ६१ कर्मचारी स्वच्छक पदावर काम करीत आहेत.ग्रामीण जनतेची विद्युतदायिनी म्हणून एसटी सेवा ओळखली जाते.
संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचे तीन झोन आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूर या तीन झोनमधून इतर जिल्ह्यांच्या अंतर्गत असणाºया तालुक्यातील एस. टी. आगाराचा कारभार चालविला जातो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत कर्मचारी यांची भरती केली जात होती.प्रत्येक आगारात एसटी बस धुऊन स्वच्छ करणे, वॉशिंग करणे, स्टँड आवारातील स्वच्छता ठेवणे, आदी कामे केली जात होती.
यासाठी महामंडळाचे स्वत:चे कर्मचारी नेमले होते. मात्र, राज्य शासनाने अचानक स्टँड डेपो व आतील फक्त डांबरी रस्ते स्वच्छ करण्याचे कंत्राट ब्रिक्स या कंपनीला देण्यात आले आहे.कंपनीने चार दिवसांपूर्वी आपले खासगी कर्मचारी आगारात पाठविले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या स्वच्छता कर्मचारी यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. खासगी कंपनी स्क्वेअर फूट बेसिसवर काम करणार आहे. त्यामुळे एसटी सेवेमध्ये स्वच्छक पदावर काम करणाºया कर्मचाºयांच्यावर टांगती तलवार आहे.
याबाबत कोणत्याच एसटीच्या संघटनेने आवाज उठवलेला नाही. तीन झोनमधील सुमारे पाच हजार कर्मचारी अतिरिक्त होणार आहेत. भविष्यात एसटी बसबरोबर कर्मचारीदेखील खासगी होऊन लाल एसटीचा रंग बदलला जाण्याची शक्यता आहे. मलकापूर आगारात खासगी कंपनीने स्वच्छता कर्मचारी नेमून काम चालू केले आहे. आठ हजार रुपयांवर महिला कर्मचारी नेमले आहेत. एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. मलकापूर आगार व्यवस्थापक यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला पत्र मिळाल्यावर माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.