इचलकरंजी : देशाच्या औद्योगिक विकासात वस्त्रनगरी इचलकरंजीचा सहभाग उल्लेखनीय आहे. या शहराचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी व वस्त्रोद्योगाला समृद्धी मिळण्यासाठी केंद्र सरकारचा दूत म्हणून प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून गरीब व उपेक्षितांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी पावले उचलली असल्याचे सांगितले.येथील घोरपडे नाट्यगृहात आयोजित व्यापारी परिसंवाद व चर्चासत्रात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, भारत जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून नवीन उंची गाठत आहे. इचलकरंजीत वस्त्रोद्योगाचा अत्याधुनिकीकरणाद्वारे सुरू असलेला विकास ऐतिहासिक आहे. विणकाम आणि प्रक्रियेच्या आधुनिकीकरणासह वस्त्रोद्योगातील गुंतवणूक आणि या क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.सुरुवातीला भाजपचे शहर अध्यक्ष अनिल डाळ्या व कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी चर्चासत्राचा उद्देश विशद केला. यावेळी ओडीसीच्या खासदार अपरजिता सारंगी यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून नऊ वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. आमदार प्रकाश आवाडे यांनी वस्त्रोद्योगाचे विविध प्रश्न मांडून ते त्वरित सोडविण्याची मागणी केली. यावेळी विविध संघटनांसह व्यापाऱ्यांच्या वतीने मंत्री शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, संजयकाका पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जयंत मराठे, राहुल आवाडे, राजगोंड पाटील, चंद्रकांत पाटील, विनय महाजन, ओम पाटणी, मयूर शहा, विनोद कांकाणी, आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
आमच्या नेत्यांमुळेच काँग्रेस सोडलीआमदार आवाडे यांनी, आपण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेसमधील आमच्या नेत्यांमुळेच ते पद सोडून भाजपला पाठिंबा दिला. आता तुम्ही ताकद देणे गरजेचे आहे. आम्ही क्लिअर केले आहे यापुढे भाजपच म्हणून आता तुमच्याकडून राहिले आहे. आमच्यात एक मत करा त्यासाठी काय करावे लागते बघा. एक मत झाल्यास जिल्ह्यात सर्वांच्या प्रयत्नातून दोन्ही खासदार व आमदारही भाजपचेच निवडून येतील, असे वक्तव्य हसत केले. या प्रत्येक वाक्याला उपस्थितांकडून जोरजोरात हसत टाळ्या वाजत होत्या.