Kdcc Bank Election : सभा आरोप-प्रत्यारोपांसाठी... मात्र व्यक्तिगत प्रचारावरच भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 12:25 PM2022-01-03T12:25:03+5:302022-01-03T12:26:06+5:30
जाहीर सभांमधून एकमेकांवर जोरदार प्रहार केला जात असतानाच राजकारणातील ‘आदानी-अंबानी’पर्यंत टीकेची पातळी पोहोचली आहे.
कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी सत्तारूढ व विरोध आघाडीमध्ये जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी प्रचार मात्र व्यक्तिगतच सुरू आहे. सगळ्याच उमेदवारांनी प्रचारपत्रिका स्वतंत्र काढून व्यक्तिगत प्रचारावर भर दिला आहे. त्यामुळे सभा फक्त आघाडी एकसंध आहे, एवढेच सांगण्यासाठी ठरत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी सत्तारूढ व विरोधी परिवर्तन आघाडी रिंगणात उतरली आहे. गेली सहा वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे नेते अनपेक्षितपणे एकमेकांच्या विरोधात भिडले आहेत. जाहीर सभांमधून एकमेकांवर जोरदार प्रहार केला जात असतानाच राजकारणातील ‘आदानी-अंबानी’पर्यंत टीकेची पातळी पोहोचली आहे.
सभांमधून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी प्रचार मात्र व्यक्तिगतच दिसत आहे. जुनी मैत्री, नात्यागोत्याचे संबंध व सोयीच्या राजकारणामुळे प्रत्येक उमेदवाराने सावध भूमिका घेतली आहे. व्यक्तिगत गाठीभेटींसह प्रचाराचे सर्व फंडे वापरले जात आहेत.
पतसंस्था, बँकांमध्ये धक्कादायक निकाल?
बँकेच्या २१ जागांपैकी पतसंस्था व बँका या गटात आमदार प्रकाश आवाडे, विद्यमान संचालक अनिल पाटील व अर्जुन आबीटकर यांच्यात काट्याची टक्कर पहावयास मिळत आहे. या गटात देवघेवीबरोबरच माेठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याने धक्कादायक निकाल अपेक्षित आहे.
‘गोकुळ’, विधान परिषद राजकारणाची झळ बसणार
‘गोकुळ’च्या निवडणुकीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारी मंडळी एकत्र आली आहेत. तेच मतदार सहा उमेदवारांना मतदान करणार आहेत. ‘गोकुळ’मध्ये झालेल्या दगाफटक्याचा हिशोब सुररू झाला असून, विधान परिषद निवडणूक जरी बिनविरोध झाली असली तरी त्या राजकारणाला अनेक कंगोरे आहेत. या दोन्ही निवडणुकांची झळ काहींना बसणार हे मात्र निश्चित आहे.
करेक्ट कार्यक्रमाची अनेकांना धास्ती
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. त्याची धास्ती येथील उमेदवारांनी घेतली आहे. येथेही शेवटच्या दोन दिवसात तशा हालचाली होण्याची शक्यता आहे. ते गृहीत धरूनच प्रत्येकाने आपापली यंत्रणा सक्रिय केल्याचे चित्र आहे.