हुपरी : हुपरीसह पंचक्रोशीतील सर्व भूमिहीन कष्टकरी शेतमजूर, चांदी कामगार, घरेलू मोलकरीण, हॉटेल मजूर, बांधकाम मजूर अशा सर्व असंघटित कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहून त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान व आनंद निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाच्या सोयी-सुविधांचा लाभ प्रत्यक्षात त्यांना मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित असंघटित कामगार मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना ‘कोविड योद्धा समाज सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी आमदार राजीव आवळे, नानासाहेब गाठ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दशरथ पिश्टे, संभाजी पवार, उपाध्यक्ष परशुराम कीर्तिकर, तुकाराम भोसले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिरीष देसाई, आभिजीत देसाई, अमित म्हातुगडे, रिजवान पटवेगार, प्रतापराव जाधव आदी उपस्थित होते. स्वागत राणोजी ठोंबरे यांनी केले तर प्रास्ताविक अनिल म्हातुगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक शेख व नानासाहेब भोसले यांनी केले तर अभिजीत देसाई यांनी आभार मानले.
----
फोटो ओळी - हुपरी (ता. हातकणंगले) येथील हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित असंघटित कामगार मेळाव्यात कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ‘कोविड योद्धा समाज सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नानासाहेब गाठ, माजी आमदार राजीव आवळे, शिरीष देसाई आदी उपस्थित होते.