कोल्हापूर : अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’साठीच्या खरेदीकरिता तरुणाईचा उत्साह ओसंडत असून दुकानांमध्ये गर्दी होत आहे. मनाला भिडणारी भेटकार्डे, भेटवस्तूंची रेलचेल सध्या बाजारात दिसत असून बाजारपेठा फुलल्या आहेत. जगभरातील प्रेमवीरांसाठी १४ फेब्रुवारी हा दिवस एक पर्वणी असून, एकमेकांबद्दल प्रेमभावना व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. या दिवशी एकमेकांना गुलाब, भेटवस्तू व शुभेच्छा कार्ड देऊन प्रेमी आपले प्रेम व्यक्त करतात. यानिमित्त प्रेमाचं प्रतीक असलेल्या गुलाबांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाली असली तरी त्याच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी सध्या महाविद्यालयांच्या जवळपास असलेली गिफ्ट आर्टिकल्सची दुकाने तरुणाईच्या गर्दीने गजबजलेली आहेत. आपल्या मनातल्या भावनांशी मिळताजुळता मजकूर असलेल्या आकर्षक भेटकार्डांच्या शोधात तरुणाईची नजर भिरभिरताना दिसत असून हेच मर्म ओळखून भेटकार्ड कंपन्यांनी विविध प्रकारची आकर्षक भेटकार्डे बाजारात आणली आहेत. त्यात पॉप-अप, म्युझिकल इंग्रजी, मराठी भाषेतील भेटकार्डे मनाला भुरळ पाडतात. रविवार, सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी गिफ्ट शॉपीमध्ये आवडीच्या वस्तू धुंडाळण्यात वेळ व्यतीत केला. प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या, फोटो फ्रेम, कपलस्टॅच्यू, लायटिंगच्या फोटोफ्रेम,बॉटलटाईप टेडी आणि विशेषकरून यंदा काचेच्या चंबूतील आकर्षक कपलस्टॅच्यू, गुलाब, हृदयाचा आकार असलेल्या प्लाज्मा लॅम्पना चांगली मागणी आहे लाल रंग हा प्रेमाचा ; त्यामुळे भेटवस्तूंची दुकाने लाल रंगात न्हाऊन निघाली आहेत. यंदा जवळजवळ सर्वच भेटवस्तूंच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. एरवी चार ते पाच रुपयांना मिळणारा गुलाब व्हॅलेंटाईन डे जसा जवळ येत आहे, तसा महाग होत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’दिवशी गुलाबाची किंमत पंचवीस ते तीस रुपये होण्याची शक्यता आहे. ज्वेलरीलाही डिमांडगिफ्ट शॉपीमध्ये युवक-युवतींच्या मनाला भावतील अशा अनेक भेटवस्तू उपलब्ध असून त्यात सॉफ्ट्टॉईज, त्यातही पुन्हा म्युझिकल-रेग्युलर शिवाय फॉर हजबंड वाईफ हे प्रकार आहेतच. यंदा व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने खास तयार करण्यात आलेली ज्वेलरी त्यात ब्रेसलेट, नेकलेस असे दागिने उपलब्ध आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’साठी तरूणाईचा अपूर्व उत्साह
By admin | Published: February 13, 2017 12:16 AM