कोल्हापूर मराठी गजलेत नवे प्रयोग करून गजलेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करणाऱ्या इलाही जमादार यांच्या निधनामुळे एक सशक्त शायर गमावला आहे, अशा शब्दात जमादार यांना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. येथील गजलसाद समूहाच्या वतीने ही बुधवारी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
प्रारंभी जमादार यांच्या प्रतिमेला सुभाष नागेशकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांनी जमादार यांच्या गजलांची, शेरांची अनेक उदाहरणे देत त्यांचे वेगळेपण अधोरेखित करीत मराठी गजलेतील योगदानाचा आढावा घेतला. तर इलाही यांच्या गजलशिष्या डॉ. संजीवनी तोफखाने यांनी त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध उगलडून सांगितले. ज्येष्ठ गजलकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. डॉ. सुनंदा शेळके, प्रा. नरहर कुलकर्णी, युवराज यादव यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्व मान्यवरांसह अशोक वाडकर, डॉ. दयानंद काळे, प्रवीण पुजारी आदींनी इलाही जमादार यांच्या गजला सादर केल्या. आदरांजली सभेस डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. दीपक बाबर, अ.बा. शेख, ओंकार पाध्ये, शीतल कोल्हापूरकर, अभय वाडकर, सुधीर कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर व गजलरसिक उपस्थित होते.
०४०२२०२१ कोल इलाही जमादार
इलाही जमादार यांच्या आदरांजली सभेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेला सुभाष नागेशकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गजलसादचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.