कोल्हापूर : खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांची एकजूट कायम आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष कायम राहील, असा निर्धार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी व्यक्त केला. खंडपीठासाठी आंदोलन सुरू असल्यामुळे असोसियशनच्या निवडी बिनविरोध कराव्यात व अॅड. शिवाजीराव राणे यांना अध्यक्ष करावे, ही अॅड. माणिक मुळीक यांची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे बार असोसिएशनची निवडणूक होणारच हे स्पष्ट झाले. न्याय संकुलातील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात असोसिएशनची वार्षिक सभा झाली. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण तर, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रवींद्र जानकर प्रमुख उपस्थित होते. त्यात अध्यक्ष चव्हाण यांनी खंडपीठासाठी कार्यकारिणीने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. खंडपीठासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांची एकजूट आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.उपाध्यक्ष चिटणीस म्हणाले, ‘खंडपीठासाठी न्याय मिळेपर्यंत संघर्ष केला जाईल. सचिव जानकर यांनी खर्चाचा तपशील सादर करून पदाधिकारी निवडीचा ठराव मांडला. त्यावर अॅड. माणिक मुळीक यांनी खंडपीठासाठीचा लढा लक्षात घेता पदाधिकारी निवड प्रक्रिया बिनविरोध करावी, अॅड.शिवाजीराव राणे यांची अध्यक्षपदी निवड करावी, असे सूचविल; परंतु अॅड. किरण पाटील यांनी पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली. त्याला सभासदांनी पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणूक घेण्याचे ठरले. अॅड. सुशीला कदम, धनश्री चव्हाण, विठोबा जाधव, सचिन मेंडके, मिलिंद जोशी, सुस्मित कामत, विजय ताटे-देशमुख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वर्गणी भरण्यासाठी सोमवारपर्यंत मुदतवार्षिक वर्गणी भरलेले सभासद हे निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सोमवार (दि. २५) पर्यंत दुपारी तीन वाजता वर्गणी भरण्याची मुदत सभेत निश्चित करण्यात आली. यादिवशी सायंकाळी पाच वाजता मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध केली जाणार असून, शनिवारी (दि. ३०) निवडणूक होण्याची शक्यता आहे.सुभाष पिसाळ निवडणूक अधिकारीया निवडणूकीसाठी अॅड. सुभाष पिसाळ यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
खंडपीठासाठी संघर्ष सुरूच राहणार
By admin | Published: April 23, 2016 1:39 AM