कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचा सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह इतर पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा सोमवारी रात्री उशिरा कोल्हापुरात पोहोचली. त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि इतर पक्षांचे वरिष्ठ पातळीवरील नेतेही कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास जन्मस्थळाला भेट देऊन कुलस्वामिनी अंबाबाईला कर्जमाफीचे साकडे घालून संघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे.या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तसेच शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे हे कोल्हापुरात सोमवारी रात्री उशिरा दाखल झाले. आज, मंगळवारी पहाटेपर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते दाखल होणार आहेत. कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून जागृती अभियान सुरू होते. विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी डिजिटल फलक उभारून संघर्ष यात्रेबाबत जागृती केली आहे. अंबाबाईला साकडे घालणार सोमवारी, सायंकाळी सोलापूर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नागरी सत्कार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रात्री उशिरा कोल्हापुरात पोहोचले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी गेले सहा महिने विरोधी पक्ष कर्जमाफीसाठी टाहो फोडत असताना सरकार मात्र गप्पच आहे. सरकारला सुबुद्धी देऊन शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी आज, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता अंबाबाईला साकडे घालण्यात येणार आहे.
कर्जमुक्तीसाठी संघर्षयात्रा कोल्हापुरात दाखल
By admin | Published: April 25, 2017 12:12 AM