कोल्हापूर : देशाची पहिली मतदार यादी करताना तत्कालीन नेत्यांनी तळागाळातील गरीब, झोपडीतील व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळवून त्याला लोकशाही मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. सध्याचे सरकार मात्र दिलेली लोकशाही काढून घेण्यासाठी धडपडत आहे, या शब्दांत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी सोमवारी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला.श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते धनाजी गुरव लिखित 'लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी' या पुस्तकाचे प्रकाशन शाहू स्मारक भवनात टकले यांच्या हस्ते झाले.निरंजन टकले म्हणाले, देशाची पहिली मतदार यादी करताना पंडित नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांनी तळागाळातील सर्वांत शेवटच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी नेटाने प्रयत्न केले. त्यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या, पूर्वीच्या धोरणांमध्ये बदल केले. कारण झोपडीतील कष्टकरी, शेवटचा माणूसच लोकशाही टिकवेल यावर त्यांचा विश्वास होता. सध्या मात्र ही लोकशाही काढून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. धार्मिक विद्वेष पेरून सत्ता मिळवायची हेच धोरण आणले जात आहे.धनाजी गुरव म्हणाले, सध्या सत्याचा आग्रह धरणे गरजेचे आहे. ही तुंबळ लढाई आहे, त्यात मिळेल ते शस्त्र घेऊन लढावे लागेल. हे पुस्तकही या शस्त्राचाच भाग आहे. यावेळी येणाऱ्या निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारा ठराव करण्यात आला.
लोकशाही टिकवणे नव्हे काढून घेण्याची धडपड, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 11:35 AM