कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मालवाहतुकीकरिता सुरू आहे. त्यामुळे दिवसभरात केवळ ५० बसेस रस्त्यावर आहेत. यातील दहा बसेस रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पुकारला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळानेही केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, पोलीस, आरोग्य विभाग, खासगी वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सेवा सुरू ठेवली आहे.
त्यामुळे दिवसभरात गडहिंग्लज, मुरगुड, कुरुंदवाड, गारगोटी, शाहूवाडी, इचलकरंजी या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील २० फेऱ्या झाल्या, तर जिल्ह्यातील ११ आगारात १० बसेस रुग्णवाहिका म्हणून कार्यरत आहेत, तर ७०० बसेस विविध आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या सूत्रांनी दिली.