कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील १२ आगारांतून होणारी प्रवासी वाहतूक पूर्णत: थंडावली. त्यामुळे या विभागाला सुमारे १ कोटी ५ लाखांचा फटका बसला. यात काहीअंशी जयसिंगपूर, इचलकरंजी आणि गडहिंग्लज विभागात तुरळक बससेवा सुरू होती. मात्र, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभला.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीच्या कोल्हापूर विभागातील बारा आगारातून रोज मुंबई, पुणे, सोलापूर, नांदेड, नाशिक अशा राज्याच्या विविध भागात ३५० हून अधिक बसेसद्वारे प्रवासी वाहतूक होते. मात्र, चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्वच बसेस बंद करण्यात आल्या होता. रविवारी दुपारपासून पूर परिस्थिती नसेल अशा जयसिंगपूर, इचलकरंजी व गडहिंग्लज भागात सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांचा त्याला अल्प प्रतिसाद लाभला. दिवसाकाठी ३५ लाख रुपये उत्पन्न असलेल्या या विभागाला गेल्या तीन दिवसांत १ कोटी ५ लाखांचा फटका बसला.
एनडीआरएफसह पुरात अडकलेल्यांसाठी ३० बसेस
कुरुंदवाड येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी १९ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर नागरिकांच्या बचावाकरिता आलेल्या एनडीआरएफच्या जवानांकरिता ६ आणि त्याच्यासोबत असलेल्या मालाच्या वाहतुकीसाठी ५ अशा ३० बसेस महामंडळाने शिरोळ परिसरात उपलब्ध करून दिल्या आहेत.
वाहतुक अधिकारीही पुरात कार्यरत
कुरुंदवाड येथे शुक्रवारी (दि.२३) च्या दुपारी एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव तेथील. स्थानकाची पाहणी आणि ‘एनडीआरएफ’च्या पथकाला बसेस ताब्यात देण्यासाठी गेले होते. या दरम्यान कुरुंदवाड व शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे प्रभावित झाला. त्याचा फटका जाधव यांना बसला. त्यांनी एका ओळखीच्या ठिकाणी शुक्रवारी रात्री आसरा घेतला. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी बोटीतून प्रथम शिरोळ आणि त्यानंतर कोल्हापूर गाठले.