संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापूरात अडकलेल्या अनेकजणांनी संचारबंदीमुळे आपापल्या गावचा रस्ता पकडला. परंतु स्वतंत्र वाहन करुन जाण्याची ऐपत नसल्यामुळे गेले दोन महिने हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थी अद्यापही कोल्हापूरातच अडकले आहेत. आॅनलाईन अर्ज केला असला तरी गावी जाण्यासाठी एसटी बसेस सुरु नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना नाईलाजाने शिक्षकांच्या घरीच रहावे लागत आहे.
मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनी ज्ञानेश्वर गडवे आणि अतुल विश्वनाथ भगत हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेतात. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गेली तीन वर्षे ते या शाळेतील विशेष विभागात शिकत आहेत. कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.
मागास भाग असल्यामुळे या परिसरातील अनेक विद्यार्थी सातवीनंतरच्या शिक्षणासाठी पुणे, मुंबई, लातूर येथे जातात. येथील सुमारे १२ विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात आणि अंध युवक मंच, हणबरवाडी या संस्थेच्या राजोपाध्येनगर येथील अंध वसतिगृहात राहतात. शाळा संपल्यानंतर १७ मार्च रोजी दहा विद्यार्थी रेल्वेने गावी निघून गेले, परंतु दहावीची परिक्षा असल्यामुळे हे दोन विद्यार्थी वसतिगृहातच राहिले. २४ मार्च रोजी या दोघांचा इतिहास, भूगोल आणि भारतीय संगीत या विषयाचा पेपर होणार होता, परंतु तत्पूर्वीच २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर झाला आणि त्यानंतर सलग चार लॉक डाउनमुळे या विद्यार्र्थ्याना गावी जाता आले नाही.
या विद्यार्थ्यांना प्रथम वसतिगृहात आणि नंतर लॉकडाउन शिथील झाल्यानंतर वसतिगृहाचे अध्यक्ष संजय ढेंगे आणि सचिव अजय वणकुद्रे यांच्या घरी रहावे लागले. कामिनी हिचे गाव शेणगाव तालुक्यातील चिखलघर येथील तर अतुलचे गाव पिंपरखुर्द येथील आहे. कोल्हापूर आणि हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावी जाण्यासाठी आॅनलाईन परवानगी काढली आहे, मात्र स्वतंत्र वाहन घेउन जाण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांना कोल्हापूरातच मुक्काम करावा लागला आहे.
परराज्यातील मजूरांना महाराष्ट्र सरकार रेल्वे, एसटी बसने त्यांच्या गावी पोहाचवत आहेत. परंतु या दोन गरीब विद्यार्र्थ्याची विनंती प्रशासनाने दुर्लक्षित केली आहे. या विद्यार्र्थ्याना हिंगोलीत त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था व्हावी.अजय वणकुद्रे,विशेष शिक्षक, विकास हायस्कूल, कोल्हापूर.