कोल्हापूर : एकरकमी एफआरपीवरून काहीसा अडखळत सुरू झालेल्या यंदाच्या साखर कारखान्यांच्या हंगामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. राज्यातील ११४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, आतापर्यंत ५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सरासरी साखर उताऱ्यातही वाढ झालेली आहे. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची एफआरपी थकली होती. साखर पोत्याचे मूल्यांकन व उचल याचे गणित घालविण्यातच नवीन हंगाम कधी सुरू झाला, हेच साखर कारखानदारांना समजले नाही. गत हंगामातील कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांचे देय असल्याने यंदाचा हंगाम कसा सुरू करायचा, या विवंचनेत कारखानदार होते. त्यात शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने कारखानदारांपुढे पेच निर्माण झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये एकरकमी एफआरपीवर ठाम राहत, कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्यातील कारखान्यांची धुराडी पेटली. आतापर्यंत पुणे विभागातील सर्वाधिक ४९ साखर कारखाने सुरू झाले असून, त्यांनी २७ लाख ८५ हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागातील ३० कारखाने सुरू झाले आहेत. कोल्हापूर विभागातील अद्याप पंचगंगा, दौलत, गायकवाड, इंदिरा, महाडिक शुगर्स, राजारामबापू, माणगंगा, महाकाली, तासगाव, निनाईदेवी, यशवंत-खानापूर हे कारखाने थंडच आहेच.
अडखळलेला साखर हंगाम चांगलाच तापला...
By admin | Published: November 17, 2015 12:21 AM