समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शालेय मुलांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा करायची; मात्र वर्ष-वर्ष त्यासाठीचे अनुदान द्यायचे नाही. संबंधितांच्या घरच्या मंडळींनीही अखेर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही या प्रकरणाचा नादच सोडावा, अशी परिस्थिती निर्माण करायचा चंगच जणू काही शासनाने बांधला आहे का? अशी विचारणा करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलांच्या मृत्यूनंतरही त्यांना मिळणारे अनुदान वर्षभर अदा न करणे ही एक प्रकारची संबंधितांची चेष्टाच म्हणावी लागेल. कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने पाठविलेल्या २५ प्रस्तावांचे १८ लाख ३६ हजार रुपये गेले वर्षभर संबंधितांना मिळालेलेच नाहीत. राज्य सरकारने पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राजीव गांधी विद्यार्र्थी अपघात अनुदान योजना’ सन २०१२-१३ पासून लागू केली. तत्पूर्वी खासगी विमा कंपनीमार्फत अपघात नुकसानभरपाई योजना लागू करण्यात आली होती. या विमा कंपन्यांकडून भरपाई मिळण्यात दिरंगाई, टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने, राज्य सरकारने शिक्षण विभागामार्फत स्वत:च ही योजना राबविण्यास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण संचालकच हे अनुदान मंजूर करतात. मात्र, तरीही परिस्थितीत फरक पडलेला नाही. अनुदान उपलब्ध होत नसल्याने प्रस्ताव मंजूर होऊनही वारसांना ते मिळत नसल्याचे अनुभव मिळत आहेत.आवश्यक त्या कागदपत्रांची पाच-सहा महिने जुळवाजुळव करून हे प्रस्ताव मुख्याध्यापकांमार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांकडे व तेथे प्रस्तावांची छाननी करून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडे पाठविले जातात व या समितीच्या शिफारशीनुसार मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे पाठविले जातात. कोल्हापूर येथे ९ मे २०१६ आणि २१ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत २५ प्रस्ताव मंजूर झाले. त्यापोटी १८ लाख ३६ हजार रुपये अनुदान येणे अपेक्षित आहे. मात्र, वारंवार लेखी पाठपुरावा करूनही ही रक्कम अजूनही मिळालेली नाही. किमान या रकमेसाठी तरी वारसांना फेऱ्या मारायला लावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आतापर्यंत ९० लाख रुपयांचे अनुदानयोजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९३ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ९३ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. आता २५ वारसांची साडेअठरा लाख रुपये येणे बाकी आहे. जुने पैसे येणे बाकी असतानाच २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या समितीची बैठक होऊन आणखी ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. अशी आहे योजनाशालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ७५ हजार रुपयांची भरपाईएक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपयेदोन्ही अवयव निकामी झाल्यास ५० हजार रु. भरपाई मिळते.
विद्यार्थी अपघात अनुदानही थकले
By admin | Published: July 04, 2017 12:15 AM