गडहिंग्लज येथील शिक्षकावर विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गुन्हा
लग्न मोडण्याचा प्रयत्न : तिच्या भावी पतीलाही पाठविले संदेश, संशयित पोलिसांच्या ताब्यात
गडहिंग्लज :
ठरलेले लग्न मोडण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनीच्या भावी पतीच्या इन्स्टाग्रामवर संदेश पाठविण्याबरोबरच तिच्या मोबाईलवरही वारंवार संदेश पाठवून, पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी स्वप्निल हराळे (रा. हाळलक्ष्मीनगर, गडहिंग्लज) या शिक्षकाविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी हा एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षक आहे. पीडित विद्यार्थिनी त्याच महाविद्यालयात शिकत होती. २०१७ ते जुलै २०२१ पर्यंतच्या कालावधीत हराळे याने तिच्याशी जवळीक साधून तिच्या मोबाईलवर संदेश पाठविले, तसेच पाठलाग करून, बदनामीची भीती घालून तिला दमदाटीही केली.
दरम्यान, पीडित विद्यार्थिनीचा विवाह निश्चित झाल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने तिच्या भावी पतीच्या इन्स्टाग्रामवर संदेश पाठवून तिचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून शिक्षक हराळे याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.