कोल्हापूर : जे शिक्षक सोमवारपर्यंत माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवत होते, त्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी पर्यवेक्षक असणाऱ्यांना मात्र स्वॅब देण्याची सक्ती केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांची काळजी नाही, पण एमपीएससीला येणाऱ्या परीक्षार्थींची काळजी, अशी भूमिका प्रशासन कसे घेते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
येत्या रविवारी एमपीएससीची चाचणी परीक्षा आहे. यासाठी शहरातील शाळांचे माध्यमिक शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. त्यांना आता स्वॅब देणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या महिन्यातही याच परीक्षेच्या दरम्यान जे शिक्षक पर्यवेक्षक म्हणून होते, त्यांना स्वॅब देणे बंधनकारक करण्यात आले होते. जर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची एवढी काळजी आहे म्हणून शिक्षकांना स्वॅब देणे बंधनकारक केले आहे, तर त्या विद्यार्थ्यांना स्वॅबची सक्ती का केली नाही. त्यांच्यामुळे आम्हाला जर लागण झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी तेच तेच शिक्षक पुन्हा पर्यवेक्षणासाठी आहेत, त्यांना आता पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा स्वॅब द्यावा लागणार आहे.
चौकट
शाळांमधील विद्यार्थ्यांची काळजी नाही का
याआधी हेच शिक्षक माध्यमिक शाळांमध्ये अध्यापन करत होते. तेथे मात्र त्यांना स्वॅबसाठी आग्रह नाही. मात्र, मोठ्या मुलांच्या परीक्षेसाठी शिक्षकांना स्वॅब बंधनकारक हा भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.