कोल्हापूर : ‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी कोल्हापुरातील रस्त्यांवर मंगळवारी हजारो विद्यार्थी, पालक उतरले. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील सामुदायिक परिपाठ आंदोलन करुन शिक्षणाच्या कंपनीकरण, खासगीकरणाच्या राज्य सरकारच्या विधेयकाला विरोध केला.राज्य शासनाने सर्व शाळांचे कंपनीकरण करुन वाड्यावस्त्यांवरील शाळा बंद केल्या आहेत. त्याचा निषेध करण्यासह संंबंधित विधेयक शासनाने मागे घ्यावे. सर्वसामान्यांचे शिक्षण वाचवावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे गेल्या दोन महिन्यांपासून जनआंदोलन सुरू आहे. यातील आणखी एक टप्पा म्हणून मंगळवारी कोल्हापुरात विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर सामुदायिक परिपाठ आंदोलन केले.
आंदोलनाची सुरुवात सकाळी अकरा वाजता मुक्त सैनिक वसाहत येथील वालावलकर प्रशालेपासून झाली. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ताराराणी चौक ते तावडे हॉटेल मार्गाच्या मध्ये उभे राहून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रार्थना, प्रतिज्ञा केली. जाधववाडी-मार्केट यार्ड परिसरातील शाळेचे सुमारे सातशे विद्यार्थ्यांना पालकांनी आपल्या समवेत घेवून मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली.
या आंदोलनामुळे संबंधित मार्गावरील वाहतुक थांबल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापर्यंत आणि उषा टॉकीजपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. मध्यवर्ती बस्थानक परिसरात विक्रम हायस्कूलच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी, तर कसबा बावडा परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी शुगरमिल मार्गावर, क्रशर चौकात वसंतराव देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
उचगाव-टेंबलाईवाडी, पाचगाव, कळंबा, फुलेवाडी, शिवाजी विद्यापीठ, शिवाजी पेठ मार्गावरील निवृत्ती चौक परिसरातील शाळांमधील विद्यार्थी या आंदोलनात रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
कृती समितीचे कार्यकर्ते आपआपल्या परिसरातील शाळांमधील आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनावेळी शाळांच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. या आंदोलनात न्यू हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, पदमाराजे हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, दसरा चौकात नेहरु हायस्कूलच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सहभाग होत शासनाचा निषेध केला.
या आंदोलनात कृती समितीचे समन्वयक अशोक पोवार, रमेश मोरे, भरत रसाळे, लालासो गायकवाड, महादेव पाटील, राजाराम सुतार, दिनकर कांबळे, सुनिल कुरणे, सी. एम. गायकवाड, राजू लाटकर, नगरसेवक अशोक जाधव, रामभाऊ कोळेकर, महादेव जाधव, महेश जाधव, राजू मालेकर, किशोर घाटगे, व्ही. डी. हिरेमठ, बी. एम. कदगर, एस. एस. पुजारी, आदी सहभागी झाले.
दसरा चौकात बुधवारी होळीशिक्षण अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या नोटीसा या अन्यायी आणि बेकायदेशीर आहेत. या नोटीसांची होळी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता दसरा चौकात केली जाणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक रमेश मोरे यांनी दिली.