सतिश पाटील- शिरोली -शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी शिरोली (ता. हातकणंगले) येथील ७९२ विद्यार्थी दररोज देवावर भरवसा ठेवून पुणे-बंगलोर हा मृत्यूचा महामार्ग ओलांडतात.सन २००६ मध्ये पुणे-बंगलोर महामार्ग पूर्ण झाला. या महामार्गामुळे शिरोली गावचे मात्र विभाजन झाले. ही गावे महामार्गाच्या पूर्वेस व पश्चिमेस अशा दोन्ही बाजूस विभागली गेली. महामार्गालगत पश्चिम बाजूस पाच माध्यमिक शाळा व दोन प्राथमिक शाळा आहेत. या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी व स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी महामार्गाच्या यादववाडी, शिवाजीनगर या पूर्व भागातून सुमारे ७९२ विद्यार्थी स्वत:चा जीव मुठीत घेऊन हा रस्ता दिवसभरात चारवेळा ओलांडतात. गेल्या सहा वर्षात या शिरोली परिसरात अनेक अपघात झाले.याठिकाणी शिरोली हायस्कूल, महाडिक हायस्कूल, शाहूसेवा हायस्कूल, आयडीएल इंग्लिश स्कूल, कौतुक विद्यामंदिर, संकल्प बालमंदिर आणि प्राथमिक विद्यामंदिर अशा सात शाळा महामार्गालगत आहेत.विद्यार्थी शाळेतून परत येईपर्यंत पालकांचे डोळे रस्त्याकडे लागलेले असतात. अगदी पाच वर्षापासून १५ वर्षापर्यंतची मुले हा रस्ता ओलांडतात. या शिरोली परिसरात महामार्गावर पादचारी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. याबाबत ग्रामपंचायतीने शासनाला पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींनी स्वत: लक्ष घालून तत्काळ पादचारी उड्डाणपूल उभा करणे गरजेचे आहे.महामार्गामुळे गावचे विभाजन झाले. पण शिक्षण घेण्यासाठी महामार्ग ओलांडून विद्यार्थ्यांना यावे लागते, हे धोक्याचे आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षणासाठी यावे लागते. शासनाने या मार्गावर तत्काळ भुयारी मार्ग अथवा पादचारी उड्डाणपूल उभा केले पाहिजे.- सुरेश पाटील, अध्यक्ष, शिरोली हायस्कूलमहामार्ग ओलांडून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना वा शिपायांना सोडायला जावे लागते. गावातील लोकांनी जागरुकता बाळगली पाहिजे. लोकांनीच उठाव करून प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उड्डाणपूल उभा करण्यास शासनाला भाग पाडले पाहिजे.- आर. एस. पाटील, शिक्षकरामचंद्र मसोजी महाडिक हायस्कूल हे तर महामार्गाला अगदी लगतच आहे. या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी हे महामार्गाच्या पूर्वभाग यादववाडी, शिवाजीनगर, दत्तमंदिर या भागातून येतात. महामार्गावरील वेगाने धावणाऱ्या गाड्या अनेकदा शाळेच्या मैदानात घुसल्या आहेत. यािठकाणी महामार्गांना सुरक्षित कठडे लावणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी उड्डाणपूल गरजेचा आहे.- प्रकाश कौंदाडे, अध्यक्ष, महाडिक हायस्कूलशिरोली ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पादचारी उड्डाणपुलाची मागणी पाच वर्षांपूर्वी केली आहे. आणि याबाबत ग्रामपंचायतीचा पाठपुरावाही सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका पोहोचू नये यासाठी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.- बिसमिल्ला महात, सरपंच, शिरोली
विद्यार्थी महामार्ग ओलांडतात ‘रामभरोसे’
By admin | Published: December 25, 2014 10:14 PM