कोल्हापूर : तब्बल तीन महिने वर्गाला शिक्षकच नसल्याने करवीर तालुक्यातील दºयाचे वडगाव येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या दारातच ठिय्या मारला. ‘शिक्षक आम्हाला मिळालेच पाहिजेत, शिक्षण आमच्या हक्काचं' अशा घोषणा देत अवघ्या चौथीत शिकणा-या या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे लक्ष वेधून घेतले. अखेर दोन दिवसांत शिक्षक देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र विद्यार्थी अर्धा तास घोषणा देत असताना कुणीही त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
द-याचे वडगाव येथील शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे २८0 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे चौथीच्या दोन तुकड्या आहेत. चौथीच्या एका वर्गावर शिकवणाºया शिक्षकाची तीन महिन्यांपूर्वी पदोन्नतीवर बदली झाली. शिवाय तत्कालीन मुख्याध्यापिका पूजा शेटवे यांनी शाळेच्या सहलीच्या पैशात भ्रष्टाचार केल्याने आणि शाळेतील फर्निचर विकल्याने त्यांची बदली करण्यात आली. यानंतर या दोन्ही वर्गांवर गेले तीन महिने एकही शिक्षक नाही.याबाबत अधिकारी, पदाधिकारी यांच्याकडे मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी पालकांसह मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडक मारली.
जोरदार घोषणाबाजीनंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांनी करवीरचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांना चर्चेसाठी पाठविले. पं. स. सदस्य प्रदीप झांबरे यांनीही येथील परिस्थिती मांडली. दोन दिवसांत शिक्षक देण्याची ग्वाही त्यांनी दिली. शिक्षक न मिळाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत शाळा व्यवस्थापन समितीचे दत्तात्रय मगदूम, अनिल पाटील, बापू शिंदे, साताप्पा बेनके, दत्तात्रय देवकुळे, दत्तात्रय परीट, आण्णा बोडके, साताप्पा मगदूम, आदींनी सहभाग घेतला.