कोल्हापूर : नॅनोमटेरिअलचे मानवी जीवनातील विविध उपयोग, सौरऊर्जा आणि इंधननिर्मितीबाबतची माहिती शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते प्राणिशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रकल्प व भित्तिपत्रकांचे प्रदर्शन. ‘वैज्ञानिक क्षेत्रातील सप्ताह’ ही संकल्पना घेऊन विद्यापीठात ‘राष्ट्रीय विज्ञान सप्ताह’ साजरा करण्यात आला.विद्यापीठातील स्कूल आॅफ नॅनोसायन्स विभागातील या प्रदर्शनाचे उद्घाटन अधिष्ठाता प्रा. डॉ. पी. एस. पाटील आणि डॉ. पी. डी. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. एस. मन्ने, समन्वयक एम. व्ही. वाळवेकर, किरण पवार, आदी उपस्थित होते.
विज्ञान विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. त्यांनी सौरऊर्जा निर्मितीसाठी लागणारे नॅनोमटेरिअल, वनस्पतींच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, इंधननिर्मिती, आदींबाबतचे १० प्रकल्प आणि ६० भित्तिपत्रके सादर केली. प्रदर्शन पाहण्यास विविध अधिविभागांतील आणि शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली.‘विज्ञानफेरी’तून जनजागृतीदरम्यान, या प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी प्राणिशास्त्र अधिविभागाच्या वतीने दसरा चौक ते शिवाजी विद्यापीठापर्यंत विज्ञानफेरी काढण्यात आली. त्यात विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ‘जागतिक तापमानवाढीचे पृथ्वीवरील परिणाम’ या विषयावर ‘जंगलाचे संवर्धन करू, पृथ्वीचेही रक्षण होईल’, ‘विज्ञान की भाषा तरखकी की नई परिभाषा’ असे संदेश फलक आणि घोषणांच्या माध्यमातून जनजागृती केली.