कोल्हापूर : यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तीक क्षमतेच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते दिलीप आवटी यांनी शिवाजी विद्यापीठात केले.
विद्यापीठातील सेंट्रल प्लेसमेंट सेल आणि तंत्रज्ञान अधिविभागातर्फे बुधवारी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रेरणादायी वक्ते आवटी म्हणाले, विद्यार्थी दशेतून समाजक्षेत्रात कार्य करताना अनेक समस्या येऊ शकतात. या समस्यांविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. आत्म कार्यक्षमतेवर विश्वास ठेऊन अशा समस्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय प्राप्तीसाठी केंद्रित असले पाहिजे. नवीन संधीच्या शोधात सतत झटले पाहिजे.
तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी म्हणाले, टेक्निकल कॉलेज म्हणजे सर्व काही नव्हे, तर स्वत:ची जडणघडण आणि वैविध्यपूर्ण कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत. या कार्यक्रमास धीरज पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तंत्रज्ञान अधिविभागाचे प्लेसमेंट सेलप्रमुख डॉ. एस. बी. सादळे यांनी प्रास्ताविक केले. सेंट्रल प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. जी. एस. राशीनकर यांनी आभार मानले.