कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठपरीक्षा व विधि शाखेत प्रवेशासाठी सीईटी अशा दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. याकरीता अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घेतली जाईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिले.
यासंदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई व कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाबा इंदुलकर यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले.शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या काही शाखेच्या परीक्षा सोमवारी (दि.२) व मंगळवारी (दि.३) होत आहेत. त्याच दिवशी विधि शाखेला प्रवेश घेणाऱ्यांसाठी द्यावी लागणारी सीईटी प्रवेश परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होणार आहे.
ही बाब प्रजासत्ताकचे देसाई व कॉमन मॅनचे इंदुलकर यांनी कुलगुरु डॉ. शिर्के यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अशा विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. त्यांच्याकरीता विद्यापीठ परीक्षा नंतर घेतल्या जातील, असे आश्वासन व लेखी पत्र त्यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत विद्यापीठ कर्मचाऱ्यांसोबत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा विद्यापीठाच्या खर्चाने कोविड विमा कवच उपलब्ध केले जाईल. शहाजी लॉ कॉलेजमध्ये एल.एल.एम. या पदव्युतर अभ्यासक्रमासही मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.